Deputy CM Eknath Shinde News: हिंदू नववर्ष सुरू झाले आहे. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मुंबईतील गिरगाव, ठाणे, डोंबिवली, नागपूर यासह राज्यातील अनेक ठिकाणी शोभायात्रांचा उत्साह दिसून आला. शोभायात्रांमध्ये अत्यंत उत्साहाने लोक सहभागी झाले आहेत. परंपरा, संस्कृती यांचे दर्शन या शोभायात्रांच्या माध्यमातून घडवण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
चैत्र नवरात्र उत्सव आहे, तो नऊ दिवसांचा उत्सव आहे. राज्यात विकास, लोकांची प्रगती, कायदा-सुव्यवस्था, लाडक्या बहिणी, भाऊ, लाडके शेतकरी या सगळ्यांची प्रगती साधणे हे आमचे ध्येय असणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच गुढीपाडव्याचा दिवस दिवस मांगल्य आणि पावित्र्याचा दिवस आहे. या शोभायात्रेत लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, अबालवृद्धांपर्यंत सगळेच जण आनंदाने सहभागी होतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
२.५ वर्षांत चांगले काम केल्याने विजयाची गुढी उभारली
या शोभायात्रेत अनेक चित्ररथ असतात. चित्ररथांमधून सामाजिक संदेश देण्याचे काम, समाज प्रबोधनाचे काम हे दाखवले जाते. मागच्या अडीच वर्षांत महायुतीने जे काम केलं त्यामुळे विजयाची गुढी आम्हाला उभारता आली. नव्या सरकारची पहिली इनिंग सुरु झाली आहे. समृद्धी आणि विकास यांच्या गुढ्या उभारणार आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्षनिमित्त शुभेच्छा देऊन 'विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या!' असे आवाहन केले. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांत अग्रेसर आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. हे नववर्ष नव संकल्पनांना बळ देईल, नवचैतन्य आणेल आणि राज्यातील नागरिकांच्या जीवनात समृद्धी, सुख-शांती आणि भरभराट घेऊन येवो,' अशी मनोकामना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.