ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकरमुंबई, दि. 13 - गोरेगाव(पूर्व) येथील गोकूळधाम मेडिकल सेंटरने रुग्णांकडून ५०० व १०००च्या जुन्या नोटा घेण्यास एकीकडे नकार दिल्यानंतर दुसरीकडे येथील डेबिटकार्ड स्वाईप मशिन देखील बंद असल्यामुळे आज सकाळी येथील सेटरमध्ये विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी आलेल्या रुग्णांना खूप मनस्ताप सोसावा लागला. अखेर महिलांनी आवाज उठवताच डेबिटकार्ड मशीन बंद असल्यामुळे अखेर येथील मुजोर व्यवस्थापनाने वैद्यकीय चाचणीची रक्कम बाकी ठेऊन वैद्यकीय चाचण्या घेण्यास परवानगी दिली. मात्र ५०० व १०००च्या जुन्या नोटा घेण्यास नकार दिल्यामुळे रुग्णांना सुट्या पैशांसाठी शोधाशोध करण्याची वेळ आली.एकीकडे केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ५०० व १०००च्या नोटा बंद केल्यानंतर वैद्यकीय खासगी, सरकारी सेवा, डॉक्टर्स आणि मेडिकल स्टोर्स यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबधितांवर करवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली होती. मात्र गोरेगाव (पूर्व) येथील गोकूळधाम मेडिकल सेंटरने ८ तारखेच्या रात्रीपासूनच येथील डॉक्टर्सकडून विविध प्रकारची वैद्यकीय तपासणी आणि रक्त, सीबीसी, एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी आणि अन्य वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी रुग्णांकडून लागणाऱ्या वैद्यकीय शुल्काची रकमेसाठी ५०० व १०००च्या नोटा घेण्यात येणार नाही, असा चक्क फलकच काउंटरवर लावला आहे.आज सकाळी तर रक्त, सीबीसी, एक्सरे, सोनोग्राफी, ईसीजी आणि अन्य वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी रुग्णांकडून एकीकडे ५०० व १०००च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास येथील प्रशासनाने नकार तर दिलाच. परंतु या वैद्यकीय सेवांचे शुल्क घेण्यासाठी येथील डेबिटकार्ड स्वाइप मशिन बंद पडले होते. त्यामुळे सुटे पैसे घेऊन या मगच वैद्यकीय चाचण्या करण्यात येथील असे मग्रुर उत्तर येथील व्यवस्थापक रितेश वादवा यांनी रुग्णांना दिले. त्यामुळे रात्री १२ तास फास्टिंग करून आपल्या पतीच्या वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या स्मिता धर्म आणि चड्डा यांनी रितेश वाद्वा यांना जाब विचारला.सरकारी, खासगी रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स खासगी डॉक्टर्स ५०० व १०००च्या जुन्या नोटा घेतात. मात्र आपल्या सेंटरमध्ये घेत नाहीत असा जाब विचारताच, आम्हाला तसे वरून आदेश असल्याचे उत्तर दिले. आणि येथील डेबिटकार्ड स्वाइप मशिन पण बंद आहे. मशिन सुरू झाल्यावर मगच तुमच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येथील, असे मग्रुरीचे उत्तर वादवा यांनी देताच आम्ही १२ तास फास्टिंगवर असलेल्या रुग्णांनी काय करायचे, असा सवाल या महिलांनी आणि इतर रुग्णांनी विचारून आपला रुद्रावतार दाखवताच त्यांनी अखेर काउंटरवर फोन करून डेबिटकार्ड मशिन बंद असल्यामुळे रुग्णांचे पैसे बाकी ठेवून वैद्यकीय चाचण्या करण्याचे आदेश दिल्यानंतर रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. शासनाचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या या मुजोर मेडिकल सेंटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत काय कारवाई करणार, असा सवाल येथे आलेल्या महिलांनी आणि रुग्णांकडून विचारला जात आहे.
गोकुळधाम मेडिकल सेंटरची मनमानी, ५०० व १०००च्या नोटा घेण्यास नकार
By admin | Updated: November 13, 2016 17:55 IST