ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १५ - आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना राज्य सरकारने झेड दर्जाची सुरक्षा द्यावी या मागणीसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले.
बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक, अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले. पोटभरे यांनी काही दिवसापूर्वीच राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेवून त्यांच्याकडे सुरक्षासंबंधीची मागणी केली होती. केंद्रीय ग्रामविकासमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने असंख्य कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी भरून काढण्याची ताकद पंकजा मुंडे-पालवे यांच्यात आहे. मुंडे यांच्या अपघाती निधनाबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे पंकजा मुंडे-पालवे यांना पुरेशी सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. पंकजा यांच्या सुरक्षेततेची खबरदारी म्हणून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात यावी असे पोटभरे यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते.