जव्हार : आदिवासी विकास प्रकल्प कायालयातमार्फत एकुण ३० आश्रमशाळा असून पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत २४५शाळा चालविल्या जात आहेत, परंतु, जिल्हा परिषदेच्या काही शाळांत इ. ४ थी पर्यंतच वर्ग असून विद्यार्थ्यांना ५ वी च्या प्रवेशसाठी वणवण करावी लागते. तसेच इ. ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांचीही हिच अवस्था असल्याचे चित्र दिसत आहे.जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा इ. ८ वी पर्यतच असल्यामुळे पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण पासून वंचित राहत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने श्रमजिवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जव्हार येथील प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी पारधे यांच्या समोर ठाण मांडून या समस्यांचा पाढा वाचला. या वेळी सहा. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई व डी.आर.गुजर तसेच जव्हार गटशिक्षण अधिकारी बी.एम. कासले, वाडा, विक्रमगड व मोखाडा येथील गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते, याबाबत चर्चेअंती असे ठरले की, शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड तालुक्यातील इ. ४ थी पास, ५ वी पास, ७ वी ८ वी ९वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षीत शाळेत किंवा नजिकच्या शाळेत किंवा आदिवासी आश्रमशाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच तसेच पुढील वर्ग आवश्यकतेनुसार सुरू करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आलेले आहे असे लेखी आश्वासन या चारीही तालुक्यातील गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले आहे.या वेळी तालुका अध्यक्ष कमळाकर भोरे, संतोष धिंडा, गणेश माळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामुळे या परिसरातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा लाभला असून समाधान व्यक्त होते आहे. (प्रतिनिधी)
श्रमजिवीच्या मागण्या अखेर झाल्या मंजूर
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST