सफाळे: पावसाळा सुरु होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात बाजारात पावसाळी रानभाज्यांचे आगमन सुरु झाले असले तरी आता बाजारात या भाज्या खवय्यांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. रासायनिक खतांवर पिकवलेल्या आणि कलमी भाज्या खाऊन प्रकृतीवर दुष्परिणाम होत असल्याने या रानभाज्यातील औषधी तत्व चिकित्सकांनाही खुणावत आहेत.कोकणाला औषधी वनस्पती व भाज्यांचे वरदान मिळाले आहे. त्यातल्या त्यात पावसाळ्यातच मिळणाऱ्या या भाज्या मोठ्या लज्जतदार असतात. पालधर जिल्हयातील जंगलामधील प्रसिध्द रानभाजी म्हणजे शेवळीकडे बघितले जाते. पावसाळयाच्या सुरूवातीला बहुतेकदा पहिल्या एक -दोन आठवडयात शेवळी या भाजीचे बाजारात आगमन होते. पालघर, डहाणू ,सफाळे इ. भागातील डोंगर उतारावर शेवळी उगवली जाते. प्रामुख्याने मानवाचा वावर नसलेल्या डोंगर कुशीत ती उगवते. या भाजीमुळे आदिवासी बांधवानां आर्थिक आधार मिळत आहे. साधारण श्रावणात शेवळी मोठी झाली की, ती लोत म्हणून ओळखली जाते. या प्रकारालाही मोठी मागणी असतेकोकणपट्टीतील ठाणे व पालघर जिल्ह्यात शेवळीची आमटी मोठया आवडीने खाल्ली जाते. शेवळी भाजी शाकाहारी तसेच मांसाहारी या दोन्ही खवय्यांची आवडती भाजी. ही भाजी वाल घालून तसेच मांसाहारी लोक या भाजीमध्ये कोळंबी इ. टाकून बनवतात. सध्या सफाळे बाजारात एका जुडीला पंधरा ते पंचवीस रूपये दराने ही भाजी उपलब्ध आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून या भाज्यांची आवक वाढते त्यानंतर त्यांचे दरही हळूहळू कमी होतात. (वार्ताहर)
रानभाज्यांत शेवळीला डिमांड
By admin | Updated: June 30, 2016 03:35 IST