ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 09 - मोबाईल फोनवरुन पिझ्झाची ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटण्यात आल्याची घटना मुंढव्यातील केशवनगरमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. चोरट्यांनी पाच हजारांची रोकड आणि पिझ्झा असा एकूण 7 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीपक कवळे (वय 26, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन मनोज यांच्यासह तिघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवळे एका पिझ्झा कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांच्या आऊटलेटमध्ये कॉल करुन मनोज याने पिझ्झाची ऑर्डर दिली. ही ऑर्डर देण्यासाठी कवळे केशवनगर येथील रेणुका माता मंदिराशेजारी पोहोचले. तेव्हा मनोज याने पैसे जवळ नसल्याचे सांगत त्यांना एटीएमममधून पैसे काढू असे सांगितले. दरम्यान, मनोज याच्यासोबत असलेल्या आणखी दोघांनी कवळे यांच्याकडे पिझ्झा सिझनिंग मागितले.
त्यांना सिझनिंग देत असतानाच आरोपींनी त्यांच्या कंबरेला असलेल्या पाऊचमध्ये हात घालून त्यातील बिलाचे जमा झालेले 4 हजार 700 रुपये व पिझ्झा असे एकूण 7 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास डी. एस. ढवळे करीत आहेत.