मुंबई : कोपर्डीची घटना १३ तारखेला रात्री घडली आणि १६ तारखेला आपण स्वत: सकाळी ८-३० च्या दरम्यान कोपर्डीला भेट दिली. तरीही आपल्याकडून त्या गावात जाण्यासाठी उशीरच झाला हे निश्चित, अशी जाहीर कबुली जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सभागृहात दिली.कोपर्डीत घटना घडली असताना तेथे भेट देण्याचे सोडून पालकमंत्री नगर जिल्ह्यात हॉटेलचे उद्घाटन करत होते, असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तुम्ही हॉटेलचे उद्घाटन करत होतात की नाही हे माहिती नाही, पण तसे असेल तर अत्यंत गंभीर आहे, असा चिमटा अजित पवार यांनीही काढला तेव्हा शिंदे म्हणाले, हे कोणते हॉटेल आहे? ज्याचे मी उद्घाटन केले, निदान त्याचे नाव तरी सांगा... उगाच काहीही आरोप करु नका. आपण कोणत्याही हॉटेलच्या उद्घाटनाला गेलो नव्हतो. मात्र आपल्याकडून कोपर्डीला जाण्यास उशीर झाला. १३ ला रात्री घटना घडली, १४ ला त्या मुलीवर अत्यंविधी झाले, आणि १५ ला राख सावडण्याचा कार्यक्रम झाला. आपण १६ तारखेला तेथे सकाळीच गेलो होतो, त्याआधी तेथे एकही नेता गेलेला नव्हता असेही शिंदे म्हणाले.>विरोधकांचा सभात्याग : कोपर्डी घटनेबाबत मुख्यमंत्र्यांच्या उत्तराबद्दल असमाधान व्यक्त करीत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. या घटनेतील हलगर्जीबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्याची माफी मागायला हवी होती, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
आपल्याकडून उशीर झाला - राम शिंदे
By admin | Updated: July 20, 2016 05:05 IST