मुंबई : गुंतवणुकीवर अल्पावधीत भरघोस व्याज देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मोहनप्रसाद श्रीवास्तव आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुंतवणूकदारांनी लेखी तक्रारी करूनही गुन्हा दाखल करण्यास मुंबई पोलिसांनी तब्बल चार महिन्यांचा कालावधी घेतल्याने दरम्यानच्या काळात आरोपी फरार होऊ शकले, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.मुंबईतील गुंतवणूकदारांचे सातशे कोटी रुपये हडप करण्याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण तपासासाठी आपल्या हाती घेतले आहे. आरोपी मोहनप्रसाद श्रीवास्तव, त्याची पत्नी विभा, मुलगा कार्तिक, सून प्रीती, मुलगी अर्चिता आणि धर्मेंद्र निकुंभ यांच्याविरुद्ध २१ एप्रिल २0१६ रोजी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्या तक्रारींची दखल घेत आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, आपल्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने पोलीस कारवाई होऊ शकते याची कल्पना आल्याने श्रीवास्तव कुटुंबीय फरार झाल्याचे डॉ. केदार गानला यांच्यासह इतर गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. आरोपी फरार होण्यास पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असल्याने एफआयआर दाखल करण्यास विलंब करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी केली आहे. आरोपी उत्तर भारतात लपले असून, रक्कम त्यांनी त्यांच्या तेथील बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. मात्र या व्याप्ती लक्षात घेता हे प्रकरण सीबीआय अथवा सक्तवसुली संचालनालयाकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गुन्हा दाखल करण्यास विलंब; महाठग झाला फरार
By admin | Updated: September 27, 2016 00:35 IST