ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 8 - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चतुर्थीचा योग साधून गोव्यात ठाण मांडले आहे. गोव्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्याचे काम त्यांनी आरंभिले आहे. गुरुवारी बांदिवडे येथील मंत्री सुदिन व दीपक ढवळीकर यांच्या निवासस्थानी र्पीकर यांनी भेट दिली व बराचवेळ विविध विषयांवर चर्चा केली.पर्रिकर यांनी गेले काही दिवस अनेकांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटाच लावला आहे. म्हापसा येथील सार्वजनिक गणोशोत्सवास तसेच म्हापशातील काही नागरिकांच्या घरी पर्रिकर यांनी भेट दिली. म्हापसा पोलिस स्थानकातील गणोशोत्सवाचेही त्यांनी गुरुवारी दर्शन घेतले. बुधवारी पर्रिकर यांनी कुंडई येथे काहीजणांच्या घरी भेट दिली होती. आल्तिनोसह पणजीतीलही काही नागरिकांच्या घरी र्पीकर यांनी जाऊन बुधवारी गणोश मूर्तीचे दर्शन घेतले होते.गुरुवारी पर्रिकर यांनी बांदिवडे गाठले व म.गो.चे नेते सुदिन व दीपक ढवळीकर यांच्या घरी भेट दिली. दुपारी तिथेच पर्रिकर यांनी जेवणही घेतले. दोन तास पर्रिकर यांनी ढवळीकर बंधूंशी गप्पा केल्या. माध्यमप्रश्नी सुरू असलेल्या वादाविषयी ते बोलले. मात्र भाजप-म.गो. युतीसंदर्भात ते बोलले नाहीत. त्यानंतर पर्रिकर यांनी फोंडा तालुक्यातील काही प्रमुख भाजप नेते व पदाधिका-यांच्या घरी भेट दिली. पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्केर हेही पर्रिकर यांच्यासोबत फिरत आहेत. राज्यातील राजकीय स्थिती तसेच संघाने केलेले बंड याविषयी ते काही जणांशी अनौपचारिकपणो बोलले व वस्तूस्थिती जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र भाजप सरकारने स्वीकारलेले माध्यम धोरण बदलणार नाही व इंग्रजी शाळांचे अनुदान बंद होणार नाही याचे संकेत पर्रिकर यांनी संघाच्या काही स्वयंसेवकांना व काही भाजप कार्यकर्त्यांना दिले असल्याची माहिती सुत्रंनी दिली....पर्रिकर आमच्या घरी गुरुवारी आले होते. त्यांनी जेवणही केले पण आम्ही राजकारणाविषयी बोललो नाही. म.गो.-भाजप युतीविषयी योग्यवेळी आम्ही चर्चा सुरू करू. अजून ती वेळ आलेली नाही.- मंत्री दीपक ढवळीकर........वेलिंगकरांकडे भेटदरम्यान, गोवा प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्या निवासस्थानी पर्रिकर यांनी बुधवारी अचानक भेट दिली पण ते वेलिंगकर यांच्याकडे माध्यम वादाविषयी किंवा राजकारणाविषयीही काही बोलले नाही. दरवर्षी पर्रिकर चतुर्थीला येतात व गणोशाचे दर्शन घेऊन जातात. त्याप्रमाणेच ते बुधवारी आले होते. आपण येणार असल्याची कल्पना त्यांनी वेलिंगकर यांना दिली नव्हती.