नाशिक : श्री काळाराम मंदिरात आमीर खानची भूमिका असलेल्या ‘पीके’ चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वाद झाला. चित्रीकरणाबाबत सुरुवातीला मंदिराचे विश्वस्त व संस्थान अनभिज्ञ होते. त्यामुळे गोंधळ उडाला.
देवस्थानतर्फे चित्रीकरणासाठी परवानगी दिली नसल्याचे विश्वस्तांनी स्पष्ट केले. परवानगी नसेल तर चित्रीकरण करता येणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र चित्रीकरणासाठी संस्थानच्या नावे 25 हजार रुपयांची देणगी दिल्याचे समजल्यानंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले.
विश्वस्त मंडळाने मंदिरात चित्रीकरणासाठी परवानगी दिली नव्हती; मात्र संस्थानचा प्रचार व प्रसार या चित्रीकरणाच्या माध्यमातून होणार असल्याने व चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी व आमीर खान यांनी विनंती केल्यानंतर संस्थानतर्फे तात्पुरती परवानगी दिली. लेखी स्वरूपात कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे मंदिराचे विश्वस्त अॅड. अजय निकम यांनी सांगितले.
आमीर खान मंदिरात लोटांगण घालत असल्याच्या दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले. काळाराम मंदिरानंतर श्री नारोशंकर मंदिर परिसरातही चित्रीकरण झाले. मंगळवारीही दिवसभर चित्रीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले.
चित्रीकरण सुरू असताना भाविकांना मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई केल्याने भाविक संतप्त झाले होते. (प्रतिनिधी)
नियमांची पायमल्ली!
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर देशातील धार्मिक स्थळे असून, काळाराम मंदिर त्यादृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे काही वर्षापासून मंदिरात चित्रीकरण करण्यास तसेच फोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसे फलक परिसरात लावलेले आहेत. मात्र सोमवारी येथे थेट चित्रीकरण होत असल्याने नियमांची पायमल्ली होत असल्याचे सांगत रामभक्तांनी नाराजी व्यक्त केली.
बघ्यांवर सौम्य लाठीमार
आमीरला बघण्यासाठी मंदिरात गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रणासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त मागवला होता. सकाळी बघ्यांची गर्दी झाल्याने त्यांना पांगविण्यासाठी काही पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.