उल्हासनगर : पाठिंब्या दिल्याच्या बदल्यात साई पक्षाला महापौरपद हवे असल्याने आणि भाजपातील तीन गटांनीही या पदावर दावा सांगितल्याने उल्हासनगर भाजापातील वाद शिगेला पोचले आहेत. पंचम कलानी याच महापौर होतील, असा दावा ओमी यांनी केल्याने हा तिढा वाढला आहे.ओमी यांच्या दाव्याने भाजपातील आयलानी, कलानी व मखिजा गटातील वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. कलानी यांचा दावा सुरू असतानाच आयलानी व मखिजा यांच्यासह साई पक्षानेही महापौरपदासाठी देव पाण्यात ठेवल्याचे बोलले जात आहे.उल्हासनगर पालिकेवर भाजपचाच महापौर आणि तोही सिंधी समाजाचा असेल, अशी हाक देत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी टीमसोबत आघाडी केली. त्यांच्या बहुतांश उमेदवारांना भाजपाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. पण भाजपाला सत्तेसाठी आवश्यक संख्या गाठता न आल्याने त्यांनी साई पक्षाला पंखाखाली घेत त्यांच्या ११ नगरसेवकांचा पाठिंबा गेतला. त्यांच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. साई पक्षाने यापूर्वी २००७ व २०१२ मध्ये शिवसेना-भाजपाला सत्तेसाठी पाठिंबा देवून त्या बदल्यात महापौरपद मिळवले होते. त्यामुळेच केवळ शहराच्या विकाससाठी साई पक्ष भाजपासोबत जाईल, हे राजकीय वर्तुळाच्या पचनी पडलेले नाही. शहर भाजपात माजी आमदार व शहर अध्यक्ष कुमार आयलानी यांचा गट प्रबळ आहे. त्यांच्या खच्चीकरणासाठी ओमी कलानी गट पक्षात आला. आयलानी यांची पत्नी मीना निवडून आल्या आहेत. महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित असल्याने आयलानी, मखिजा, कलानी यांना त्या पदाचे स्वप्न पडते आहे. तसेच स्वप्न साई पक्षालाही पडत असल्याने तिढा वाढला आहे. (प्रतिनिधी) >‘साईपेक्षा शिवसेना बरी’पदावरून सुरू झालेल्या भांडणामुळे भाजपातील एका गटाने साई पक्षापेक्षा शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा, असे मत मांडले आहे. निवडणुकीनंतर स्थानिक राजकीय गरजा लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवलीप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, याचा दाखला ते देत आहेत. साई पक्षापेक्षा शिवसेनेच्या अपेक्षा कमी असतील, असा त्यांचा दावा आहे.
महापौरपदावरून भाजपात वाद
By admin | Updated: March 1, 2017 03:31 IST