ऑनलाइन लोकमत
डेहणे : मंदोशी (ता. खेड) येथील घाटात दरीजवळ मोबाईलवर सेल्फी घेत असताना तोल जाऊन पडल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
सुप्रिया नंदकिशोर चव्हाण (वय २७) असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सिंहगड रोड (पुणे) येथील नंदकिशोर चव्हाण पत्नी सुप्रियासह आज सकाळी भीमाशंकरला आले होते. संध्याकाळी पुण्याकडे परतताना मंदोशी घाटात थांबले. दोघेही ओल्या असलेल्या कठड्यावर उभे राहून सेल्फी घेताना पाय घसरून पडले. खाली खोल दरी असल्याने महिलेच्या डोक्याला मार लागला.
पत्नीची गंभीर अवस्था पाहून चव्हाण मदतीसाठी दरी चढून वर आले, रस्त्याने जाणाºया पर्यटकांना कळल्यावर त्यांनी त्वरित दरीत उतरून महिलेला वर काढले. चारचाकी वाहनात महिलेला डेहणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गंभीर अवस्था पाहून त्यांना चांडोली येथे पाठविण्यात आले होते. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. परंतु या उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.