ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 10 - वसईमधील कळंब येथील तुलसी रिसॉर्टमधील तरण तलावात बुडून शाम त्रिमूळ (३८) याचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. शाम मद्यधुंद अवस्थेत असताना रात्री तरणतलावात उतरला होता. यावेळी जीवरक्षक अथवा सुरक्षारक्षक नसल्याने शाम बुडल्याचे उशिरा लक्षात आले.
कांदीवली येथे राहणारा शाम आपल्या मित्रांसह फिरायला कळंब येथील तुलसी रिसॉर्टमध्ये आला होता. रविवारी रात्री साडेआठ वाजता सर्वजण जेवायला निघून गेले होते. त्याआधी त्यांनी मद्यपान केले होते. कुणाचेही लक्ष नसताना शाम मद्यधुंद अवस्थेत तरणतलावात उतरला होता. बराच वेळ झाला तरी शाम दिसत नसल्याने त्याचा शोध सुरु केला. त्यावेळी शाम बेशुद्धावस्थेत पाण्यात आढळून आला. मित्रांनी बेशुद्धावस्थेत त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अर्नाळा सागरी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुर्घटनेच्यावेळी तरणतलावाजवळ सुरक्षारक्षक अथवा जीवरक्षक नसल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. तर शाम तलावात उतरण्याआधी दारु प्यायला होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली.