कल्याण : डोंबिवलीतही ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचा प्रकार घडला असून, पदपथावर झोपलेल्या मायलेकीला जीव गमवावा लागला आहे. डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगातील इनोव्हाची धडक समोरून येणाऱ्या स्कोडा गाडीला बसली आणि ती बाजूकडील पदपथावर चढली. इनोव्हा गाडीचा वेग इतका होता, की दोन दुकानांच्या बाहेरील भागातील भिंतीला धडक देऊन ती त्या ठिकाणी झोपलेल्या मीनाकुमारी (३०) आणि तिची मुलगी पुष्पा (१०) या दोघींवर चढल्याने त्या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. मीनाकुमारी ही शेजारच्या शिवमंदिराबाहेर भीक मागून मुलीला महापालिकेच्या शाळेत पाठवत होती. या घटनेत तेथील एका ज्वेलर्स दुकानाचे काही प्रमाणात नुकसान झाले. अपघातग्रस्त इनोव्हा गाडी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या मालकीची असल्याची माहिती आहे.अपघातात स्कोडा गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी इनोव्हाच्या चालकाविरोधात दारूच्या नशेत गाडी चालविणे यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
डोंबिवलीत ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह भरधाव कारखाली मायलेकींचा मृत्यू
By admin | Updated: September 24, 2015 01:39 IST