खालापूर : तालुक्यातील रेक्झीनचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एक कामगार ठार झाला असून, चार कामगार आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असून, कंपनी व्यवस्थापनाने घडलेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाचे पितळ उघडे पडले असून, पालकमंत्री मेहता यांनी या प्रकरणात कठोर चौकशीचे आदेश दिले आहेत.खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथे मंगलम् आॅरगॉनिक्स केमिकल (दुजोदवाला केमिकल) हा रेक्झीनचे उत्पादन करणारा कारखाना आहे. या कारखान्यात कामगार पहिल्या पाळीत काम करत असताना दुपारी १२ वाजण्याच्या कंपनीला अचानक आग लागली. या वेळी कंपनीत १५०पेक्षा अधिक कामगार काम करीत होते. आग लागल्यानंतर एकच पळापळ झाली. यात सिकंदर अन्सारी हा कामगार आगीत होरपळल्याने त्याचा जागीच ठार झाला. तर धर्मेंद्र सिंग हा ७० टक्के भाजला असून, मंगेश गोमारे व रामप्रसाद हे दोन कामगारही या आगीमध्ये होरपळले आहेत.आग लागल्यानंतर घटनास्थळी खोपोली नगरपालिका, उत्तम स्टील, पाताळगंगा एमआयडीसी व एचओसी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सुमारे ५ तासाहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
भीषण आगीत कामगाराचा मृत्यू
By admin | Updated: June 23, 2015 02:31 IST