विक्रमगड : तालुक्यातील साखरे शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या कौशल्या कुशा भरसटचा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षितपणामुळे गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला, तर कमल चौधरी या ११ वर्षाच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्याबरोबरच आणखी १० मुलांना ताप आला असून त्यांना दाखल करण्यात आले आहे.गुरुवारी सकाळी कौशल्याला विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात नेले होते. तिच्यावर उपचारही करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची रक्ततपासणी करण्यास सांगितले. पण, त्या रक्त न तपासता निघून गेल्या, अशी प्रतिक्रिया डॉ. मिलिंद खांडवी यांनी दिली. परंतु, अचानक रात्रीच्या वेळी असे काय झाले की, त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला व कमल चौधरी या विद्यार्थिनीला नाशिक येथे का पाठवावे लागले, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा मृत्यू आश्रमशाळेत झाला आहे. शुक्रवारी जेव्हा सकाळी या विद्यार्थिनीला घेऊन आले, तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. या शाळेतील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा झाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी तिच्या आईवडिलांनी केली आहे. या आश्रमशाळेमध्ये गेल्या ५ ते ६ वर्षांपासून ही चौथी घटना आहे. या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी मृत विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी केली आहे. (वार्ताहर)
आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Updated: October 8, 2016 04:18 IST