मुंबई : अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करण्याची मुदत गुरूवारी सायंकाळी सात वाजता संपली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख २१ हजार ९१२इतकी होती. याउलट पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे सुमारे ६३ हजार विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश निश्चित होणे शिल्लक होते.शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्लेल्या माहितीनुसार, प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडतील. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक होते. अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्जात नोंदविलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. अनेकांना दुसऱ्या ते पाचव्यापसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नव्हते, त्यांना ४ जुलै रोजी प्रकाशित होणाऱ्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यता आहे.प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी आहे. मात्र त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने पहिल्या यादीतील महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेला असावा.पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करण्याची मुदत गुरुवारी संपल्याने ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीत लागलेल्या महाविद्यालयात गुरूवारपर्यंत प्रवेश निश्चित केलेला नाही, ते प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर पडणार आहेत. त्यामुळे त्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे अशक्य ठरणार आहे. (प्रतिनिधी)
अकरावीच्या पहिल्या यादीतील प्रवेशाची मुदत संपली
By admin | Updated: July 1, 2016 04:03 IST