तळवडे : जुन्या रुढी व परंपरेनुसार मुलगा वंशाचा दिवा मानला जातो. अखेरच्या क्षणी पाणी पाजण्यासाठी मुलगा हवा, असे मानले जाते. परंतु, तळवडे येथील गोठे कुटुंबीयांनी या परंपरेला छेद दिला आहे. वडिलांच्या इच्छेनुसार मुलीनेच त्यांचा अंत्यविधी नुकताच केला. गेल्या काही दिवसांपासून रामचंद्र भिकाजी गोठे यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. गोठे यांची तब्येत अचानक खालावली. त्यावेळी त्यांनी अंत्यसंस्कार लाडकी मुलगी रेश्मा हिनेच करावेत, अशी इच्छा मेव्हणे वसंत चव्हाण यांच्याजवळ बोलून दाखविली होती. त्यावर कुटुंबीयांच्या विचार इच्छा तिने पूर्ण केली. रेश्मा ही त्यांची एकुलती एक मुलगी. तिच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. मुलगी शिकावी, तिने आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी तब्येत ठीक नसतानाही ते कामावर जात असत. घरखर्चाला पैसे मागितल्यावर ते नाही असे म्हणत. पण, मुलीने शिक्षणासाठी पैसे मागितल्यास तिला कधीच निराश केले नाही, अशी आठवण त्यांच्या पत्नी लता यांनी सांगितली.रेश्मा ही दहावीत शिकणारी अत्यंत हुशार मुलगी आहे. दहावीत ९०%पेक्षा गुण पाडण्याचा प्रयत्न करणार असून, शिकून वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले. पण, कमावत्या वडिलांचे छत्र हरपले आहे व घरची परिस्थितीही बेताचीच असल्याने रेश्माच्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी व समाजाकडून आर्थिक पाठबळ हवे आहे.(वार्ताहर)
मुलगी ठरली वंशाचा दिवा
By admin | Updated: January 6, 2016 00:36 IST