कमलेश वानखेडे - नागपूर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विविध जबाबदा:या पार पाडल्यानंतर आता माजी खा. दत्ता मेघे हे भाजपावासी होण्याच्या मार्गावर आहेत. भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना ‘मैत्री’चा हात देणार अहेत. गडकरी-मेघे यांची रविवारी बैठक होणार असून, त्यात मेघेंच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल व दोन दिवसांत तशी रितसर घोषणा होईल, अशी विश्वसनीय माहिती भाजपाच्या गोटातील सूत्रंनी दिली आहे. याबाबत मेघे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
लोकसभा निवडणुकीत मेघे यांचे पुत्र सागर यांनी वर्धेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीपूर्वी मेघे यांनी भाजपामध्ये येऊन सागर यांना वर्धेत भाजपाकडून लढवावे, असा गडकरींचा आग्रह होता. पक्षाच्या संसदीय मंडळात गडकरींनी आपले वजन वापरून वर्धेचा निर्णय थांबवून ठेवला होता. दत्ता मेघेही त्यासाठी तयार होते. मात्र, ‘बाबां’च्या प्रेमात सागर यांनी काँग्रेसकडून लढण्याला अधिक पसंती दर्शविली. मात्र, या निवडणुकीत सागर यांचा दारूण पराभव झाला़ अशात पुन्हा एकदा गडकरीत दडलेल्या त्यांच्या मित्रने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सागर यापूर्वी भाजपाकडून विधान परिषदेत निवडून गेले होते. त्यावेळीही गडकरींनीच त्यांना मदत केली होती. मात्र, मध्येच सागर यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम केला. हा प्रकार गडकरींसह भाजपामधील अनेकांना खटकला होता. आता वर्धेतील पराभवानंतर दत्ताभाऊ भाजपावासी होणार असल्याच्या चर्चेमुळे भाजपामध्ये दबक्या आवाजात जुना इतिहास चर्चिला जात आहे.
दत्ता मेघे यांनी पवार यांच्यासोबत काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे ‘घडय़ाळ’ सोडत पुन्हा काँग्रेसचा मार्ग धरला. वर्धेतून लोकसभा लढले व खासदार झाले. दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हाच त्यांचे भाजपा प्रवेशाचे ठरले होते. राज्यसभाही निश्चित झाली होती. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी लालकृष्ण अडवाणींना फोन करून तासाभरात खेळ केला व तिकीट कापले, असे राजकीय सूत्रंकडून सांगितले जाते. तेव्हा जे हुकले ते आता साध्य होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर गडकरी- मेघे यांच्या राजकीय मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे पहायला मिळेल.