होऊ दे चर्चा...
(स्थळ : डबक्याच्या काठावर बेडकांचा घोळका जमलेला. अत्यंत गहन विषयावर गंभीर चर्चा करण्यासाठी, तातडीनं बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वांचेच डोळे मोठे झालेले. तसं ते नेहमीच असतात; हा भाग वेगळा!)पहिला बेडूक : (नेहमीप्रमाणं खच्चून ओरडत) डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. आज इथं तमाम 'मंडूक'बांधवांना का बोलावलंय, हे सर्वांच्या लक्षात आलं असेलच.दुसरा बेडूक : (मागच्या पायानं चिखल झाडत) होय. होय. सध्या 'मानव'जातीकडून आपला 'मंडूकवंश' नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय.तिसरा बेडूक : (रागारागानं जीभ बाहेर काढून पुन्हा पटकन आत घेत) म्हणूनच तमाम मानवांचा निषेध करण्यासाठी ही तातडीची मीटिंग बोलाविण्यात आलीय. डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. निषेध. निषेध. चौथा बेडूक : (जोरजोरात उड्या मारत) थांबा. तीनशे रुपये मिळाले की, कोणत्याही सभेत जाऊन घोषणा देणार्या कार्यकर्त्यांप्रमाणं उगाच अतिउत्साही होऊ नका.बेडकीण : (छोट्या पिलांना आपल्या पोटाच्या पदराखाली झाकत) त्या मानवांनी आता परत काय केलं ? ्रआपल्या भाईबंदाना पुन्हा त्यांच्या प्रयोगशाळेत नेलं की काय? पहिला बेडूक : (भल्या मोठय़ा घशातून छोट्या माशाचा आवंढा गिळत) त्या मानवांनी विज्ञानात प्रगती केली, ती केवळ आपल्या जीवावर. पोटं फाडली आपली..अन् पाठ थोपटून घेतली स्वत:ची.दुसरा बेडूक : (अंगावरचा चिखल झटकत) तरीही आपण डबक्यातल्या घाणीत शांत बसून रहिलो. वेळप्रसंगी अंगावर चिखलही ओढवून घेतला.तिसरा बेडूक : (डोळे गरागरा फिरवत) पण, ही राजकीय बदनामीची राळ मात्र आता सहन करण्यापलीकडची.चौथा बेडूक : (चित्रविचित्र आवाज करत) काल-परवा म्हणे, कुणी 'रेल्वे इंजिन'वाल्या नेत्यानं नेहमीच्या तिखट 'राज'कीय शैलीत विरोधकांवर टीका करताना त्यांना चक्क आपली उपमा दिली. 'ते विरोधक म्हणे आपल्यासारखं डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ करतात.' कित्ती मोठ्ठा हा आपला अपमान ?छोटा बेडूक : (दगडाच्या कपारीतून हळूच बाहेर येत) विरोधकाची टिंगल करताना त्या 'राज'नं म्हणे स्वत:ची इवलीशी 'बेटकुळी'ही दाखविली. अगं आईऽऽ 'बेटकुळी' म्हणजे कोणत्या जातीच्या 'बेडकाची कुळी' गं?पहिला बेडूक : (त्वेषानं स्वत:चं पोट फुगवत) त्या नेत्याच्या 'बेटकुळी'पेक्षा माझी 'बेडूककुळी' कितीतरी मोठ्ठी. बेडकीण : (चिडून पाण्यात सूर मारून) हेच ते. इथंच तर चुकतोय आपण. आपली कुवत माहीत नसताना मोठ-मोठी स्पर्धा करायची सवय लागलीय तुम्हाला त्या उमेदवारांसारखी. डबक्याबाहेरचं जग माहीत नाही आपल्याला; अन् बाता तर बैलाच्या आकाराएवढय़ा. यामुळंच तर इतर नेत्यांशी तुलना केल्यानं होतेय आपली घोर बदनामी .सारे बेडूक : (एक सुरात) म्हणूनच माणसांच्या 'कुपमंडूक' वृत्तीचा निषेध असो. डरॉँवऽऽ डरॉँवऽऽ. निषेध. निषेध.
- सचिन जवळकोटे