शिवाजी गोरे / दापोली (जि. रत्नागिरी)डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे. येत्या मेपर्यंत हा प्रकल्प सुरू होणार असून त्यानंतर सौर ऊर्जेवर चालणारे हे पहिले कृषी विद्यापीठ ठरणार आहे. भविष्यात देशातील विजेची वाढती समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सोलर मिशनच्या माध्यमातून सरकारी कार्यालये सोलर ऊर्जेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प आकार घेणार आहे. याबाबत केंद्र सरकारने नेमलेल्या विकासकाशी (डेव्हलपर) विद्यापीठाचा करार झाला आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी विकासकाला थेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे.कृषी विद्यापीठाला दरवर्षी सात ते आठ लाख युनिट विजेची आवश्यकता भासते. महावितरणच्या विजेचा दर प्रतियुनिट नऊ ते दहा रुपये आहे; परंतु सोलर युनिट बसविल्यास यातून विद्यापीठाला पाच लाख ३५ हजार युनिट वीज मिळणार असून, त्याचा दर प्रतियुनिट पाच रुपये ५९ पैसे एवढा असणार आहे. यातून महावितरण कंपनीपेक्षा तीन रुपये प्रतियुनिट दर कमी होणार असून, विद्यापीठाच्या वीज बिलात वर्षाला सुमारे २५ लाखांची बचत होणार आहे.
दापोलीत सोलर उर्जा प्रकल्प
By admin | Updated: January 28, 2017 03:41 IST