कस्टमच्या चार लाचखोर उपायुक्तांना अटक, सहा जणांवर सीबीआयची कारवाइ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:52 AM2018-05-02T05:52:19+5:302018-05-02T05:52:19+5:30
एका व्यापाऱ्याकडून आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी ५ लाखांची लाच घेताना, अबकारी विभागाच्या (कस्टम) चौघा उपायुक्तांसह सहा जणांना
मुंबई : एका व्यापाऱ्याकडून आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी ५ लाखांची लाच घेताना, अबकारी विभागाच्या (कस्टम) चौघा उपायुक्तांसह सहा जणांना सीबीआयने सोमवारी रात्री अटक केली. मुकेश मीना, राजीवकुमार सिंग, सुदर्शन मीना, संदीप यादव या उपायुक्तांसह मनीष सिंग व नीलेश सिंग अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनीष सिंग हा कस्टममध्ये अधीक्षक असून, नीलेश ही खासगी व्यक्ती आहे. लाचेची रक्कम घेत असताना, केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई शाखेने ही कारवाई केली आहे.
या लाच प्रकरणात कस्टममधील अन्य दोघे उपायुक्त व एक अधीक्षक सहभागी आहे. अटक केलेल्या पाच अधिकाºयांची कार्यालये व निवासस्थानांची झडती घेण्यात आली. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
कस्टमच्या न्हावा-शेवा येथील विभागीय कार्यालयात एका व्यापाºयाने प्रस्ताव सादर केला होता. त्याला पूरक अभिप्राय देण्यासाठी उपायुक्त मुुकेश मीना व अन्य अधिकाºयांनी ५० लाखांच्या रकमेची मागणी केली. त्यापैकी पाच लाखांचा पहिला हप्ता सोमवारी घेण्याचे ठरले. नीलेश सिंग या सगळ्या व्यवहारात मध्यस्थीचे काम पाहात होता. या व्यापाºयाने याबाबत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर, पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. लाच प्रकरणात अन्य दोन उपायुक्त व एका अधीक्षकाचाही सहभाग असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौघे उपायुक्त तसेच अधीक्षक मनीष सिंग यांच्या कार्यालय व घरातील महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.