पिंपरी : ‘लोकमत’ सीएनएक्स व नंदादीप प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे सौदागर येथील सिटी प्राइड सिनेमागृहात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा प्रीमिअर शो झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी सैराटला डोक्यावर घेतले. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला.झी स्टुडिओचा ‘सैराट’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. त्याचा पहिला प्रीमिअर शो ‘लोकमत’ने आयोजित केला होता. त्या वेळी दिग्दर्शक नागराज मुंजळे यांच्यासह रिंकू राजगुरू (आर्ची), आकाश ठोसर (परशा), तानाजी गळगुंडे (बाळ्या), आरबान शेख (सल्या) हे चित्रपटातील कलाकार आणि कुतुब इनामदार (एडिटर), भारत मंजुळे (संवादलेखन), भूषण मंजुळे (संवादलेखन), राम पवार (अभिनेते), नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता ढमाले, रॉयल सिनेमाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अडवाणी, पुष्कराम आदी उपस्थित होते.दिग्दर्शक मंजुळे म्हणाले, ‘चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. चांगले विषय समाजापुढे आणण्याचा माझा प्रयत्न असतो. सामाजिक जाणिवा समृद्ध करण्याच्या दृष्टीने सैराट हे पुढचे पाऊल आहे. हा चित्रपट रसिकांना निश्चित आवडेल.’ रिंकू राजगुरू व आकाश ठोसर म्हणाले, ‘चित्रपटाचा आनंद काही वेगळाच होता. चित्रपटाविषयी काही बोलणे यापेक्षा प्रत्यक्ष चित्रपटाची अनुभूती घ्यावयास हवी. तो सर्वांना निश्चितच आवडेल.’नीता ढमाले म्हणाल्या, ‘लोकमत’च्या सहकार्याने नंदादीप प्रतिष्ठानने सैराट चित्रपटाच्या प्रीमिअरचे आयोजन के ले. मंजुळे हे प्रयोगशील दिग्दर्शक आहेत. त्यांचे चित्रपट हृदयस्पर्शी असतात. सामाजिक भान देण्याचा प्रयत्न सैराटने केला आहे. सैराटचा लवकरच आॅस्कर प्रवास घडो.’या वेळी ढमाले यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. नंदादीप प्रतिष्ठान या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. (प्रतिनिधी)
‘सैराट’च्या प्रीमिअरला उदंड प्रतिसाद
By admin | Updated: April 30, 2016 01:19 IST