ऑनलाइन लोकमतबीड, दि. ४ : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या मजनूवर गुरुवारी रात्री शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. धक्कादायक म्हणजे त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध गर्भपातही केला. ही घटना शहरातील थोरातवाडी येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, शेख आमेर शेख इसाक (रा. जुनाबाजार, बीड) असे त्या मजनूचे नाव असून पीडित तरुणी सध्या पदवीचे शिक्षण घेते. ती शहरातीलच थोरातवाडी येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षांपूर्वी तिची शेख आमेरशी ओळख झाली. त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करुन लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. शेख आमरेपासून तरूणीला दिवस गेले.
त्यानंतर त्याने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. दरम्यान, तिने लग्नाची मागणी करताच त्याने जातीवाचक शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. त्यानंतर तरूणीने नातेवाईकांसह ठाणे गाठले. गुरूवारी रात्री नऊ वाजता बलात्कार व अॅट्रॉसिटी अॅक्टअन्वये गुन्हा नोंद झाला असून, आरोपी फरार आहे. तपास उपअधीक्षक गणेश गावडे हे करीत आहेत.