ठाणे : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली फडणीस ग्रुप आॅफ कंपनीविरुद्ध गुरुवारी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याच्या विविध योजना फडणीस ग्रुप आॅफ कंपनीने सादर केल्या होत्या. ठिकठिकाणी प्रतिनिधी नेमून या योजनांसाठी गुंतवणूकदारांचा शोधही घेतला. ठाण्यातील वृंदावन बसस्टॉपजवळ राहणारे मुकुंद धायगुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या योजनांमध्ये ठाण्यातील ८०० ते ९०० गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. योजनेची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळाला नाही. अनेकांना कंपनीने दिलेले धनादेशही अनादरीत झाले. फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. कंपनीचे चेअरमन विनय फडणीस, संचालिका अनुराधा फडणीस, सायली फडणीस (गडकरी), साहिल फडणीस, शरयू ठकार यांच्यासह कंपनीचे इतर संचालक आणि प्रतिनिधी सच्चिदानंद यांच्याविरुद्ध नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. (प्रतिनिधी)
फडणीस ग्रुप आॅफ कंपनीविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: April 29, 2017 02:52 IST