लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ व ब्रँडेड कृषी मालास जीएसटीमधून वगळावे, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी शुक्रवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. यामुळे मुंबई बाजार समितीमधील धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. जीएसटीमध्ये ब्रँडेड अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ, सुकामेवा या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. मसाल्याच्या पदार्थांवर ५ टक्के व सुकामेवासह इतर वस्तूंवर १२ ते १८ टक्के कर लावण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक बंद पाळण्यात आला. एपीएमसीची दोन्ही मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. भारतीय उद्योग व्यापार मंडळ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, शासन काय भूमिका घेणार? यावर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. धान्य व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना असलेल्या ग्रोमाचे अध्यक्ष शरद मारू यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, जीएसटीमधून सरसकट सर्व कृषी मालास वगळण्याची मागणी आम्ही केली आहे. खाद्यान्न व सुकामेवा, मसाल्याच्या पदार्थांवरील कर वगळण्यात यावा, अशी मागणी करून ती मान्य न केल्यास, भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
जीएसटीविरोधात एपीएमसीमध्ये कडकडीत बंद
By admin | Updated: July 1, 2017 02:49 IST