उपेंद्र कुशवाह : समता पुरस्कार वितरण सोहळा, समतेचे चक्र पुढे जात आहे
पुणो : महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले; मात्र याच मुलींचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण पाहिल्यानंतर हा फुले यांच्या विचारांचा देश आहे का, असा प्रश्न पडत असल्याची खंत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने फुले यांच्या पुण्यतिथी-समता दिनानिमित्त महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणो म्हणून बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना कुशवाह आणि समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
व्यासपीठावर महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रतिभा नेमाडे, आमदार जयदेव गायकवाड, दीप्ती चवधरी, योगेश टिळेकर, प्रा. हरी नरके, माजी महापौर वैशाली बनकर, माजी आमदार कमल ढोले पाटील आणि कमल व्यवहारे उपस्थित होते.
कुशवाह म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे विचार हे महाराष्ट्रात जेवढे रुजलेले आहेत, तेवढे इतर राज्यात नाही.’’
फुले यांना जातीच्या बंधनात अडकवू नका, फुलेवाडा हे आमचे नेहमीच ऊर्जाकेंद्र राहिले आहे, असे सुरुवातीलाच स्पष्ट करून छगन भुजबळ म्हणाले, ‘‘कडवट विचारांच्या लोकांची आज खरी आवश्यकता असून, हीच विचारसरणी देशाला तारू शकणार आहे. आज रामपालसारखा भोंदू या देशात उगवतो, असे किती महाराज असतील, त्याच्या मागे किती लोक आहेत, मग अशा महाराजांचा विचार घेणार का? फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचारच यावरील उपाय आहे. समतेचे चक्र हळूहळू पुढे जात आहे; मात्र एखादी शक्ती समतेचे चक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न करते, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)