- संतोष हिरेमठ, औरंगाबाद
आईला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर होणाऱ्या वेदना पाहून मन आक्रोश करायचे त्यातच आईचे निधन झाले आणि डोक्यावर आभाळच कोसळले... मात्र वेळीच स्वत:ला सावरत ‘त्याने’ कॅन्सरग्रस्तांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. सतीश महाजन असे या आरोग्यसेवकाचे नाव आहे. स्वत:च्या पगारातील रक्कम खर्च करून रुग्णसेवा सुरू केली. कॅन्सरग्रस्तांसाठी त्यांनी केलेले काम पाहून डॉक्टर्स, उद्योजक यासह अनेक जण त्यांच्यासोबत जोडले गेले. ‘सी केअर फाऊंडेशन’ स्थापन करून त्यांनी कार्याला अधिक बळ दिले.आजाराशी यशस्वी लढा देण्यासाठी औषधांबरोबरच रुग्णाचे मनोधैर्य वाढणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे गोळ्या, औषधांची मदत करण्याबरोबर कॅन्सर रुग्णांसाठी धार्मिक गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या तीन वर्षांत जवळपास ४०० जणांना गोळ्या, औषधे पुरविणे, आहार मार्गदर्शन इ. मदत केली आहे. सतीश महाजन यांच्या या कार्यात आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांच्यासह अनेकांची मदत होत आहे.