भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदेसोलापूर : ज्यांच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सूत्रे दिली होती, त्यांनी भ्रष्ट कारभार केला. आता ते भ्रष्टाचारी भाजप-सेनेत गेले. आता काँग्रेस स्वच्छ झाली असून, पारदर्शक कारभार करणार आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या चाव्या माझ्याच हाती राहतील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जेलरोडसमोरील केएमसी गार्डनमध्ये आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, अॅड. यु. एन. बेरिया, तौफिक हत्तुरे, माजी नगरसेवक रफिक अडते, सद्दाम नाईकवाडी, मुख्याध्यापक असिफ इक्बाल, रियाज शेख, रऊफ शेख आदी उपस्थित होते. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागाचा आदर करणारा आहे. त्यामुळेच शहीद पत्नीला संधी दिली. आतापर्यंत सोलापूरचा विकासकामे केली. साडेसहा लाख लोकसंख्या असताना उजनीवरून जलवाहिनी टाकली. हीच जलवाहिनी आता १३ लाख लोकसंख्येची तहान भागवत आहे. विरोधक टीका करतात, पण त्यांना विचारा गेल्या दुष्काळात याच जलवाहिनीने सोलापूरकरांची तहान भागविली, तुम्ही काय करीत होता. पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भरपूर आश्वासने दिली व सर्वांना पैशासाठी रांगेत उभे केले, याचा राग लोक या निवडणुकीत काढणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार प्रणिती शिंदे यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने क्रॉस व्होटिंग होणार नाही याची काळजी घ्या. निवडणुकीत २० उमेदवार आहेत अन् सत्तेची स्वप्ने बघणाऱ्यांना हैदराबादला परत पाठवा, असे आवाहन केले. यावेळी अॅड. जहीर सगरी, राजाभाऊ सलगर, मकबुल मोहोळकर, साजिया शेख, रफिक हत्तुरे, जाकीर नाईकवाडी, मैनोद्दीन शेख, जुबेर कुरेशी यांची भाषणे झाली. ---------------------------अब चाय ठंडी हो गयी...राज्यात भाजप-सेनेत मारामारी सुरू आहे. एकमेकाला खंडणीबहाद्दर, पाकीटमार बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे अन् हे काय नीट सत्ता चालवू शकतात. तिकडे केंद्रात चहावाले गोड बोलून पंतप्रधान झाले, पण आता त्यांना सांगा तुमचा चहा थंड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा चहा चालणार नाही, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदे
By admin | Updated: February 17, 2017 12:55 IST