पुणे : ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे होणार असल्याचे जाहीर झाल्यापासून संमेलनस्थळावरून वाद निर्माण झाला आहे. आता कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्याची वेळ आली तरी हा वाद शमलेला नाही; उलट त्याला नवे वळण लागले आहे. स्थळ निवड समिती सहा सदस्यांची असतानाही केवळ दोन सदस्यांनी पाहणी केल्याचे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात एकाच व्यक्तीने स्थळाची पाहणी केली असून ती कशी केली, असा नवा वाद उद्भवला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. संमेलन स्थळ म्हणून घुमानची निवड कशी झाली, याविषयी प्रश्न विचारण्यात आले. संमेलन स्थळ निवड समितीत पुंडलीक अतकरे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रदीप दाते यांच्यासह महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व कोषाध्यक्ष सुनील महाजन होते. परंतु पायगुडे व महाजन हे दोघेच जण स्थळ पाहणीसाठी घुमानला गेले होते, असे वैद्य यांनी यापूर्वीच सांगितले आहे. स्थळ निवडताना पाहणी करणाऱ्या सगळ्यांची मते जाणून घेऊन महामंडळ निर्णय घेते अशी पद्धत आहे. येथे केवळ एकच जण पाहणीसाठी जात असेल तर त्याच्या मतानुसार निर्णय कसा घेतला जातो, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वी उस्मानाबादची पाहणी करण्यात आली होती. बैठकीत त्यावर जवळपास शिक्कामोर्तब ही झाले होते. मग अचानक असे काय झाले , असे प्रश्नही यावेळी विचारला गेला.
घुमानच्या मुद्द्यावरून वादंग
By admin | Updated: September 25, 2014 04:31 IST