ठाणे : रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात येथील व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारल्यानंतर येथील अनधिकृत रिक्षा स्टॅण्डही हटवण्याची मागणी केली होती. परंतु, वाहतूक पोलीस ते हटवण्यास तयार नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, अखेर वाहतूक पोलिसांनी ते स्टॅण्डच रद्द केले आहे. त्यामुळे आता स्टेशन रोड परिसर हा आता खऱ्या अर्थाने फेरीवालामुक्त परिसर झाल्याने येथील व्यापाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. रस्ता रुंदीकरणानंतर स्टेशन परिसर ते जांभळीनाका रस्त्यावर अनधिकृतरीत्या फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने येथील व्यापारी त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. तसेच येथील अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड हटवण्याऐवजी वाहतूक पोलिसांनी त्यालाच मंजुरी दिल्याने व्यापारी संतप्त होते. सोमवारी या भागात फेरीवाला आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. फेरीवाल्याने व्यापाऱ्याला धमकी दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्व व्यापाऱ्यांमध्ये पसरले आणि येथील सुमारे २०० व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर, रात्री उशिरा एका शिष्टमंडळाने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांचीदेखील भेट घेऊन या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. आता ठाणे महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर कारवाईची सुसाट एक्स्प्रेस सुरू केली आहे. परंतु, रिक्षा स्टॅण्ड हटवले नव्हते. (प्रतिनिधी)
वादग्रस्त अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड केले रद्द
By admin | Updated: October 20, 2016 03:57 IST