आजपासून अधिवेशन : दुष्काळ, एलबीटी, विजेवरून सत्वपरीक्षानागपूर : दुष्काळ, कर्जमाफी आदी मुद्यांवरून नव्या सरकारला विधिमंडळात घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसतर्फे विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी कोरडवाहूला हेक्टरी २५ हजार रुपये व ओलितासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.विदर्भ-मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघाला आहे. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हातून गेले. धानही करपले. कापसाचे उत्पादनही कमी झाले आहे. ऊसाला योग्य भाव मिळालेला नाही. बहुतांश गावांची आणेवारी चुकीची काढलेली आहे. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मंत्रिमंडळ निश्चित करण्यात रममाण होते. आता ते केंद्राकडे ४५०० कोटींचे पॅकेज मागितल्याचे सांगत आहेत, पण राज्य सरकार म्हणून भूमिका जाहीर करीत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार रुपये व ओलितासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करावे. तसेच विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशन एक महिना चालण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते आ. विजय वडेट्टीवार,माजी खा. विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. सजंय दत्त, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, प्रदेश सचिव मुन्ना ओझा आदी उपस्थित होते.
काँग्रेसचा ‘हल्लाबोल’ मोर्चा
By admin | Updated: December 8, 2014 01:00 IST