वसंत भोसले कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय म्हणजे कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील गटा-तटाचे, कुरघोड्यांचे राजकारण अनेक दशके चालत आले आहे. देश किंवा राज्य पातळीवर कोणत्याही राजकीय प्रवाहाने कॉँग्रेसच्या वर्चस्वाला आजवर आव्हान दिलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारी संस्थांच्या पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची एकहाती सत्ता कायम आहे. सध्या चालू असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका मात्र त्याला अपवाद ठरू लागल्या आहेत. या दोन्ही मित्र पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात आले आहे, असे म्हणण्यापेक्षा या पक्षांनीच ते ओढवून घेतले आहे. भारतीय जनता पक्ष ही नवी ताकद गावपातळीवरील राजकारणात उदयास येऊ पाहत आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा संपणार तर आहेच, पण दक्षिण महाराष्ट्र एक नवे राजकीय वळण घेणार आहे. कोल्हापूरची जिल्हा परिषद कायमच कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. सातारा आणि सांगलीच्या जिल्हा परिषदा त्यांच्या स्थापनेपासून कॉँग्रेसकडे होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून त्या या पक्षाकडे बहुमतासह आहेत. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतपत ताकद कोणत्याही राजकीय पक्षात नाही. त्यामुळेच या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या सदस्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगी आहे. सातारा आणि सांगली जिल्हा परिषदांच्या इतिहासात भाजपला प्रवेश करता आलेला नाही. मात्र, या निवडणुकीत साताऱ्याचा अपवाद वगळता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत भाजपने मित्रपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने आव्हान उभे केले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी केंद्र तसेच राज्यातून सत्तेवरून फेकली गेली असतानाही गटबाजीची ईर्षा करण्याची मस्ती अजूनही करीत आहे. याला कंटाळून दोन्ही कॉँग्रेसचे दुसऱ्या फळीतील असंख्य कार्यकर्ते, नेते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. सांगलीची भाजपची टीम म्हणजे कालची राष्ट्रवादी कॉँग्रेसची फळीच आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची नवी फळी बहुतांश कॉँग्रेसची नेतेमंडळी आहेत. साताऱ्यातही काही प्रमाणात असेच घडले आहे. अशाही परिस्थितीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला राज्यातील स्पर्धक गावा-गावांत आला असतानाही नेत्यांची अंतर्गत भांडणाची हौस काही संपली नाही. परिणामी या तिन्ही जिल्ह्यांतील राजकारण दोन्ही कॉँग्रेसच्या भोवती फिरते, त्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्याच्या परिणामी, अजितदादा पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, प्रतीक पाटील, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, सतेज डी. पाटील, हसन मुश्रीफ, आदींची अप्रतिष्ठाच होणार आहे. एकही पक्ष एकसंघपणे निवडणूक लढवीत नाही. सर्वच जिल्ह्यांत या पक्षांना गटबाजीने पोखरले आहे. याचा लाभ उठवीत भाजपने आव्हान निर्माण करण्याचे अवसान आणले आहे. कोल्हापूरमध्ये जवळपास एकहाती सत्ता कॉँग्रेस पक्षाकडे आहे; पण जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि माजी मंत्री आ. सतेज पाटील यांच्यात संघर्ष आहे. पी. एन. पाटील यांचे जवळचे संबंध भाजपला सक्रिय मदत करणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी आहेत. त्यावरून सतेज पाटील यांच्याशी संघर्ष होतो आहे. परिणामी, अनेक तालुक्यांत कॉँग्रेसला उमेदवारही मिळालेले नाहीत. सत्तारूढ पक्षाची ही दयनीय अवस्था केवळ गटबाजीमुळे झाली आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ओढवून घेतले आव्हान!
By admin | Updated: February 17, 2017 01:03 IST