मुंबई : दुष्काळ, अवकाळी पावसाने राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे^-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली. शेतकऱ्यांना मदत देण्याचीच शासनाची भूमिका असल्याचे सांगून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना मदतीची भूमिका शासनाने घेतली असून विरोधक मात्र केवळ राजकारण करीत आहेत. कर्जमाफीची घोषणा सरकार करीत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी सांगितले, की गोवंशाचे रक्षण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना गोवंश चराईसाठी शासकीय जमीन नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात येईल. अपंग, वृद्ध आणि अनुपयुक्त गोवंशाचे रक्षण करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चाच्या तीन गोग्रामांची निर्मिती करावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (फळबागांसह) मदत देण्याची शासनाची भूमिका आहे. महसूल विभागात कर्मचाऱ्यांच्या २५ ते ३० टक्के जागा रिक्त असून, त्या टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी
By admin | Updated: March 17, 2015 01:20 IST