ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - सलग दुसऱ्या दिवशीही आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. शिल्लक राहिलेल्या १४८ जागासाठी अंतिम फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
मोठ्या संख्येने इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. बुधवारी विद्यार्थ्यांनी तोडफोड करून संताप व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. शिल्लक राहिलेल्या १४८ जागांसाठी मंगळवारी आयटीआयमध्ये अंतिम फेरी घेण्यात आली. आयटीआय प्रशासनाने ठरलेल्या नियमानुसार पहिले येणाऱ्या २८० विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, गोंधळ निवळण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.
परिणामी प्रवेश प्रक्रिया खोळंबली. बुधवारी पुन्हा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. बुधवारी विद्यार्थ्यांना संचालनालयातर्फे एसएमएस मिळाले. त्यामुळे मंगळवारी निराश होऊन गेलेले विद्यार्थी परत आयटीआयमध्ये पोहचले. मात्र नोंदणीची प्रक्रिया मंगळवारीच बंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने, विद्यार्थी संतप्त झाले. त्यांच्याकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांना पाचारण केल्याने सर्व मुलांना कॅम्पसबाहेर काढण्यात आले. दिवसभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागला होता. १०६३ जागांसाठी आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला जुलै महिन्यापासून सुरुवात झाली. ४ राऊंड अतिशय सुरळीत पार पडले. शिल्लक १४८ जागांसाठी हा सर्व राडा झाला