मुंबई : मेल-एक्स्प्रेसमधून जाण्यासाठी प्रवाशांकडून आॅनलाइन तिकीट काढले जाते. मात्र, तिकीट बऱ्याच वेळा वेटिंग लिस्टवर (प्रतीक्षा यादी) येत असते. शेवटपर्यंत तिकीट कन्फर्म होत नसल्याने प्रवाशांची धावपळ उडते. ही अडचण लक्षात घेता, आयआरसीटीसीमार्फत (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम) प्रवाशांना कन्फर्म तिकिटासाठी ‘पर्याय’देण्यात आला आहे. प्रवाशांनी ज्या ट्रेनचे तिकीट आरक्षित केले आहे, ती ट्रेन सुटल्यानंतर १२ तासांच्या आत त्याच मार्गावरील अन्य ट्रेनची आरक्षण यादी तपासली जाईल. त्या ट्रेनमध्ये आरक्षण उपलब्ध असल्यास, तत्काळ प्रवाशाला कन्फर्म तिकीट दिले जाईल. यासाठी रेल्वेकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात आली असून, फक्त आॅनलाइनसाठीच सुविधा उपलब्ध आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, तिकीट काढताना प्रवाशांना ट्रेनचे ‘पर्याय’ दिले जातील. मात्र, हे पर्याय जरी दिले, तरी त्या आधीची निवडलेली श्रेणीच प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये मिळेल. त्यांना अन्य श्रेणी मिळणार नाही. प्रवाशांकडून तिकीट काढल्यानंतर, ‘कन्फर्म’ यादी ही ट्रेन सुटण्याच्या अगोदर चार तास आधी तयार होते. त्याच वेळी प्रवाशाला ‘कन्फर्म’माहिती मिळते. यादीत नाव न आल्यास प्रवाशांकडून प्रवासासाठी अन्य पर्याय निवडला जातो. त्या वेळी प्रवाशांची धांदल उडते. अशा वेळी हा पर्याय चांगलाच उपयोगी ठरू शकते, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. यासाठी अतिरिक्त शुल्क नसले, तरी पहिल्या ट्रेनचे आरक्षित तिकिटाचा परतावा मात्र प्रवाशांना मिळणार नाही. ८३ जणांना कन्फर्म ‘पर्याय’१ एप्रिलपासून सेवा सुरू होताच, आतापर्यंत ८३ जणांना ‘कन्फर्म पर्याय’ देण्यात आला आहे. १ एप्रिल ते ४ एप्रिलपर्यंत मुंबईतून २, दिल्लीतून २५, चेन्नईतून ४१, कोलकातातून १४ जणांना ही सेवा देण्यात आली. (प्रतिनिधी)
वेटिंग लिस्टसाठी आता कन्फर्म ‘पर्याय’
By admin | Updated: April 6, 2017 02:09 IST