मुंबई : खंडणीसाठी धमकावणे व मारहाण करणे या गुन्ह्यांसाठी अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी ५० हजारांचा जामीन मंजूर केला़ यातील इतर आरोपी शब्बीर शेख व असिफ चुनावाला यांच्या जामीन अर्जावर दोन दिवसांनी सुनावणी होणार आहे़तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी इक्बालने घरी बोलावून मारहाण केली़ त्या वेळी शेखनेही मारले, अशी तक्रार एका रिअल इस्टेट एजंटने भायखळा पोलीस ठाण्यात केली़ त्यानंतर हे प्रकरण जे़ जे़ मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले़ याप्रकरणी पोलिसांनी इक्बाल व शेखला अटक केली़ त्यानंतर असिफलाही अटक झाली़ यात जामीन मिळावा यासाठी या तिघांनीही स्वतंत्र अर्ज केले़ इक्बालच्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली़ त्यात इक्बालला या प्रकरणात गोवण्यात आले असून, त्याच्याविरोधात ठोस पुरावा पोलिसांकडे नाही़ त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली़ मात्र याचा तपास अजून सुरू आहे़ तसेच इक्बाल हा दाऊदचा भाऊ आहे़ त्याला जामीन मिळाल्यास तक्रारदाराच्या जिवाला होऊ शकतो़ इक्बाल पुराव्यांशीही छेडछाड करू शकतो, तेव्हा जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला़ अखेर न्यायालयाने इक्बालला ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला़ (प्रतिनिधी)
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला सशर्त जामीन
By admin | Updated: February 10, 2015 02:42 IST