मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला गतिमान करण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या स्वच्छता वार्तापत्र कार्यक्रमाने आज एक वर्ष पूर्ण केले. महाराष्ट्राच्या महानगरांपासून छोट्या-मोठ्या गावांमध्ये झालेल्या स्वच्छताविषयक चळवळी, मोहिमा, कार्यक्रम यांना यात स्थान दिलेले असते. हे वार्तापत्र वर्षभर सादर करणारी सह्याद्री ही देशातील एकमेव वाहिनी ठरली आहे.गेल्या २ आॅक्टोबर रोजी दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्या कल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली. स्वच्छताविषयक कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असले तरी त्यांना प्रसारमाध्यमांत पुरेसे स्थान मिळत नाही. त्यामुळे हळूहळू त्यातील उत्साह ओसरू लागतो. हे टाळून केवळ अशा कार्यक्रमांना वाहिलेले एखादे वार्तापत्र सुरू करावे, या भूमिकेतून या कार्यक्रमाचा शुभारंभ सह्याद्री वाहिनीवरून झाला. मुंबई महापालिकेचे आयुक्त पहिल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रत्येक बुलेटीनमध्ये महाराष्ट्रातल्या शहरांत, गावांत घडणाऱ्या स्वच्छता कार्यक्रमांचा सचित्र वृत्तान्त, ध्वनिचित्रफिती व त्यातील वृत्ताशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्याधिकारी यांची छोटेखानी मुलाखत यांचा समावेश असतो.
सह्याद्री वाहिनीवरील लोकप्रिय स्वच्छता वार्तापत्राचे वर्ष पूर्ण
By admin | Updated: October 2, 2015 03:57 IST