ऑनलाइन लोकमतश्रीगोंदा, दि. 23 - नवरदेवांची लग्नापूर्वी वाजतगाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली, वरातीही तरर्र होऊन नाचत होते, अशाच परिस्थितीत नवरदेवाला घेऊन घोड्याने ठोकली धूम आणि एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर नवरदेव घोड्यावरून खाली पडला.या घटनेत नवरदेव जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घारगाव येथे घडली आहे. चांडगाव येथील रामदास म्हस्के यांचे चिरंजीव सचिन आणि रुई छत्तीशी येथील प्रमोद भवर यांची कन्या सुप्रिया यांचा २३ रोजी घारगाव येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात थाटामाटात शुभविवाह आयोजित केला आहे. नवरदेवाची हौस करण्यासाठी सासऱ्याने बारामतीवरून घोडा आणला.सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नवरदेव सचिनला सूट-बूट घालून कपाळी मुंडावळ्या बांधून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली, नवरदेवाचे मित्र डीजेच्या तालावर नाचत होते, वऱ्हाडी मंडळी भोजनाचा आस्वाद घेण्यात गर्क होती, डीजेवर देवाचं गाण लागलं आणि घोड्यावाल्याने घोड्याचा नाच सुरू केला. घोडा नाचविणा-याकडून घोड्याचा लगाम सुटला आणि घोड्याने नवरदेवाला घेऊन धूम ठोकली. सुमारे एक किमी अंतरावर शेतात नवरदेव खाली पडला. वऱ्हाडी मंडळींनी नवरदेवाला दवाखान्यात नेले आणि उपचार केले. तोपर्यंत नवरदेवाच्या मित्रांनी घोड्यावाल्याची धुलाई केली. त्यानंतर सुमारे एक तास उशिरा झालेल्या लग्नात सचिन व सुप्रिया विवाहबद्ध झाले. ...आणि मी लग्न विसरलो आयुष्यात कधी घोड्यावर बसलो नाही. लग्नात प्रथमच घोड्यावर बसलो. घोड्यावर बसताना मनात वेगळा आनंद होता. पण ज्यावेळी घोड्याने मला घेऊन धूम ठोकली, माझ्या हृदयाचे ठोके वाढले, त्या क्षणी लग्न विसरून जीव वाचण्यासाठी देवाचा धावा करीत होतो आणि परमेश्वराने माझ्यावरील विघ्न टाळलं.
शुभमंगल होण्यापूर्वीच नवरदेवाला घेऊन घोड्याने ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 16:50 IST