हणमंत गायकवाडलातूर : धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला असून, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ७७६ जोडप्यांचा विवाह झाला. सामूहिक विवाह सोहळ्याची ही चळवळ आता गावपातळीवर नेण्याचा मानस असल्याचे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उपवर मुलींच्या लग्नाची चिंता पालकांना भेडसावते. मात्र, धर्मादाय संस्थांच्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, राज्यात ठिकठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होत आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात घरचे लग्न समजून अनेक जण राबत आहेत. आतापर्यंत ३ हजार ४६ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात शुभमंगल झाले आहे. त्यात मुंबई विभागातील ठाणे ७७६, रायगड ४६, नाशिक विभागात नाशिक १२०, धुळे ५१, जळगाव ६३, नंदूरबार ८४, पुणे विभागात पुणे ३०१, अहमदनगर १४, सातारा ६२, सोलापूर १२०, कोल्हापूर विभागात कोल्हापूर ६२, सांगली २०, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद विभागात औरंगाबाद १३१, परभणी १, नांदेड २६, हिंगोली १००, लातूर विभागात लातूर ४५, उस्मानाबाद ७६, बीड १०१, अमरावती विभागात अमरावती ५१, अकोला ३९, बुलढाणा १०१, यवतमाळ ७५, वाशिम २०, नागपूर विभागात नागपूर ५१, भंडारा ६, चंद्रपूर ७५, गडचिरोली १०२, गोंदिया ११ असे एकूण ३ हजार ४६ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला. जून महिन्यामध्ये वर्धा आणि जालना येथे सामूहिक विवाह सोहळा होणार असल्याचेही धर्मादाय आयुक्त डिगे यांनी सांगितले.एकाच मंचावर जाती-धर्मातील जोडप्यांचे विवाह सोहळे होत असल्याने सामाजिक सलोखाही वाढत आहे. ही चळवळ गावपातळीवर नेण्याचा प्रयत्न धर्मादायचा असेल, असे शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले.
राज्यात ३ हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:37 IST