अलिबाग : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राज्यात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने व राज्य सरकारच्या सहयोगाने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेसाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य झाडू घेऊन उत्स्फूर्तपणे रस्ता साफ करताना दिसले.‘स्वच्छ भारत, समृद्ध भारत’ अभियानांतर्गतच्या स्वच्छता माहिमेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यातील एकूण २७ शहरांत १ लाख ८१ हजार ३९६ श्री सदस्यांनी सक्रिय श्रमदान करून १८ लाख ५ हजार १२७ चौरस मीटरचे क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करण्यात यश मिळविले असल्याची माहिती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या स्वच्छता माहिमेत विविध शहरांतील ५,४२४ कि़मी़ अंतराचे रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले. ९८६ मे. टन सुका तर १ हजार ५४ मे. टन ओला एकूण २,०४० मे. टन कचरा संकलित करून तो विल्हेवाटीकरिता नियोजित ठिकाणी रवाना केल्याचेही त्यांनी सांगितले.
लाखो श्री सदस्यांची राज्यभरात स्वच्छता मोहीम
By admin | Updated: November 17, 2014 04:38 IST