अलिबाग : ज्येष्ठ निरूपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १ मार्च या जयंती दिनी, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील ११ राज्यातील तब्बल ३ हजार २७१ ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात राज्यात तब्बल ३ लाखांपेक्षा अधिक बैठक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभागी होऊन सद्गुरूंना आदरांजली अर्पण केली आहे.डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख व राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या संपूर्ण नियोजनातून साकारलेल्या या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ रेवदंडा येथे निरूपणकार सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी करण्यात आला. ५३ जिल्ह्यातील १७९ तालुकास्तराच्या शहरांमध्ये तर ५४६ गावांमध्ये बुधवारी स्वयंसेवक सकाळी ७ वाजल्यापासून सक्रिय कार्यरत झाले होते. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या स्वच्छता अभियानात २७८७ टन सुका कचरा तर ९८८९ टन ओला कचरा संकलित करण्यात आला. या संकलित कचऱ्याची सुयोग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याकरिता स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.स्वच्छता अभियानात ४ हजार २८३ किमी अंतराचे रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले, तर २५.७५ किमी अंतराचे समुद्र किनारे कचरामुक्त करण्यात आले आहेत. ११५ रेल्वे स्थानकांची स्वच्छता देखील या अभियानांतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व दिल्ली या राज्यांमध्येही स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित देशव्यापी स्वच्छता मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली होती. या वेळी पुन्हा या अभियानाची नोंद घ्यावी लागेल असे अभियान स्वच्छता सहभागातून संपन्न झाले आहे. (विशेष प्रतिनिधी)ज्येष्ठ निरूपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनी, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियानाचा रेवदंडा येथे शुभारंभ झाला. त्या वेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी निरूपणकार सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी.>115 रेल्वे स्थानकांची स्वच्छता देखील या अभियानांतर्गत करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह अकरा राज्यात स्वच्छता मोहीम
By admin | Updated: March 2, 2017 05:13 IST