नवी मुंबई : सहा दशकांपासून चित्रपटसृष्टीविषयी सातत्याने लेखन करणारे ज्येष्ठ सिनेअभ्यासक, लेखक व पत्रकार इसाक मुजावर (८१) यांचे नवी मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीचा जिता - जागता इतिहास म्हणून त्यांची ओळख होती. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे हिंदी व मराठी सिनेसृृष्टीविषयी सविस्तर माहिती देणारा दुवा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मुजावर मागील पाच वर्षांपासून नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर १० मधील गेहलोत सोसायटीत वास्तव्याला होते. ९ फेब्रुवारीला न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी तेरणा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया बरा झाला, परंतु नंतर युरीन व इतर त्रास सुरू झाला. गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. उपचार सुरू असतानाच तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी रुक्साना व रुबीया व नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर नेरूळमधील कब्रस्तानमध्ये नातेवाइकांच्या उपस्थितीमध्ये दफनविधी करण्यात आला. (प्रतिनिधी)
सिनेअभ्यासक इसाक मुजावर यांचे निधन
By admin | Updated: February 27, 2015 01:56 IST