पुणे : ग्रामीण भागासमोरील सर्वांत मोठी समस्या म्हणजे विजेचे भारनियमन आणि शहराला भेडसावणारा घनकचरा व्यवस्थापन प्रश्न. मात्र, इच्छाशक्ती असेल तर अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात या दोन्ही प्रश्नांचे समूळ उच्चाटन होऊ शकते, हे सिद्ध केले आहे. झील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘सुधारित चुलीचा मोबाईल चार्जर’ आणि ‘घरगुती जैव-यांत्रिकी खत निर्मिती’ या दोन्ही प्रकल्पांना जी.एम.आर.टी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळाले.या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे सहायक प्राध्यापक आशिष गंदिगुडे म्हणाले की, प्रदूषणरहित सुधारित चूल पारंपरिक चुलीपेक्षा कमी वजनाची, इंधनबचत करणारी आणि कमी वेळेत अन्न शिजवणारी आहे. पारंपरिक चुलीमधून अतिरिक्त उष्णता बाहेर जात असते. चुलीमधील तापमान उच्चतम आणि बाहेरचे तापमान हे कमी असते; मात्र सुधारित चुलीमधील रिव्हर्स पेल्टिअर किटमुळे इलेक्ट्रॉल हे उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे जातात, आणि व्होल्टेज जनरेट होते. त्यातून मोबाईल चार्ज केला जाऊ शकतो. ग्रामीण भागात १६ ते १८ तास वीज नसते, तिथे चुलीच्या माध्यमातून ५ व्होल्टपर्यंत मोबाईल बॅटरी चार्ज होऊ शकते. आज शहराला स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले जात आहे; मात्र अजूनही कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटलेला नाही. घनकचऱ्याचे विघटन करण्यासाठी डंबिंग यार्ड, बायोगॅसनिर्मिती असे प्रकल्प उभारले गेले आहेत; मात्र निर्माण होणाऱ्या १६०० मेट्रिक टनमधील केवळ ७०० मेट्रिक टन कचऱ्याचेच विघटन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. याचाच विचार करून घरगुती जैव-यांत्रिकी खत निर्मिती’मध्ये विद्यार्थ्यांनी बाजारातील उपलब्ध यंत्रांचा अभ्यास करून बाजारभावापेक्षा कमी किमतीत हे यंत्र तयार केले आहे. आज बाजारात जी खते निर्माण होतात, त्यामध्ये आर्द्रता शोषून घेण्याचे प्रमाण कमी आहे. याकरिता कुंभाराकडून एक कम्पोझर बनवून घेतले, ज्यामध्ये आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता अधिक आहे. हवेचा वावर जास्त हवा, यासाठी भांड्याला भोक पाडले आहे. या प्रकल्पामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. यासाठी महापालिका वर्षाला ६० कोटी रुपये खर्च करते.आमच्या प्रकल्पातून तयार झालेले खत कृषीभवनच्या खत नियंत्रण प्रयोगशाळेकडून तपासण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना प्रदूषणरहित सुधारित चूल पारंपरिक चुलीपेक्षा अत्यंत उपयोगी आहे. भविष्यात हा प्रकल्प मार्गदर्शक ठरेल.- श्रुती सावंत, विजेती विद्यार्थिनी‘घरगुती जैव-यांत्रिकी यंत्र’ घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे. - आदित्य भावसार, विजेता विद्यार्थी
चुलीवर होईल मोबाईल चार्ज; विद्यार्थ्यांचे नवे ‘इनोव्हेशन’
By admin | Updated: March 2, 2016 08:36 IST