संदीप आडनाईक/पणजी : भारत आणि चीनमार्फत तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असून यासंदर्भातील सहनिर्मितीचा करार सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती चीनच्या फिल्म ब्युरोची उपमहासंचालक जोयू जिआॅनडाँग यांनी गोव्यात केली.गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या फिल्म बाजारच्या नॉलेज सिरीज या सत्रात जिआॅनडाँग यांनी ही घोषणा केली. येत्या सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या चीनच्या सिल्क रुट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही भारताचे चित्रपट कंट्री फोकस या विभागात दाखविण्यात येणार असल्याचे जिआॅनडाँग यांनी सांगितले. यंदाच्या इफ्फीत चीनचे २१ चित्रपट दाखविण्यात येत आहेत. यातील काही गाजलेले चित्रपट कंट्री फोकस या विभागात दाखविण्यात येत आहेत. जिआॅनडाँग यांनी सांगितले, की चीनी संत ह्युआॅन त्संग यांच्या भारतातील प्रवासावर आधारित तांग डिनिस्टिी मंक या धार्मिक आणि ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात येईल. चीनचे प्रसिध्द दिग्दर्शक वांग कर वर्ई हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. वांग कर वई यांना यंदाच्या इफ्फीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या द ग्रँडमास्टर हाआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट असणार आहे.दुसरा चित्रपट स्टॅनले ताँग यांचा कुंग फू योगा भारताच्या वायकॉम १८ आणि चीनच्या ताईहे या कंपनीची निर्मिती असेल तर तिसरा चित्रपट कु झेहँगच्या गाजलेल्या दोनशी मीटर हिट लॉस्ट इन थायलंड या चित्रपटाचा सीक्वेल असेल.