- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - दहावीत शिकणारा 14 वर्षीय निर्मल वाघ घरातून पळून गेला होता. पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर त्याचा शोध लागला. त्याच्या कुटुंबियांकडे त्याला सोपवण्यात आलं आहे. घर सोडून जाण्याचं कारण जेव्हा निर्मलला विचारण्यात आलं तेव्हा काश्मीरमधील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी आपल्याला लष्कराची मदत करायची होती असं त्याने सांगितलं.
निर्मल वाघने गेले काही दिवस काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांशी लढण्याचा हट्ट धरला होता. यावरुन त्याचे मित्र त्याची मस्करीही करत होते. 'काश्मीरमध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या घटनांमुळे तो व्यथित होता', असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे.
निर्मल अभ्यासात अत्यंत हुशार आहे. वसईमधील एम जी परुळेकर शाळेत तो शिकतो. निर्मलने 10 ऑगस्ट रोजी घर सोडलं आणि रात्री 9.30 वाजता मुंबई सेंट्रलहून अमृतसरला जाणा-या गोल्डन टेम्पल एक्स्प्रेसमध्ये चढला. एक्स्प्रेस सुरतला पोहोचली तेव्हा टीसीने विना तिकीट प्रवास करत असल्याने त्याला ट्रेनमधून उतरवलं. निर्मलजवळ फी भरण्यासाठी ठेवलेले अडीच हजार रुपये होते. त्याच्याकडे मोबाईल फोन नव्हता. 10 ऑगस्टला जेव्हा तो घरी परत आला नाही तेव्हा कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. सुदैवाने पोलिसांनी त्याला शोधलं.
14 ऑगस्टला निर्मलच्या वडिलांच्या फोनवर एक मिस कॉल आला होता. त्यावरुन पोलिसांनी निर्मलचा शोध लावला. पानीपुरी विकणा-याच्या झोपडीत तो राहत होता. पोलिसांनी त्याला सुखरुप कुटुंबियांच्या हवाली केलं आहे.