अहमदनगर- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका गावातील शाळेतून चाळीशी-पन्नाशीच्या वयातील विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाची दहावीची परीक्षा नियमित शाळेत जाऊन दिल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यातही बहुतांश विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना आईचे नाव ‘बाई’असे दिले आहे. एका विद्यार्थ्याच्या कॉपीच्या तपासात हा गंभीर प्रकार समोर आला. त्याची दखल घेत पुणे विभागीय मंडळाने संबंधित शाळेचा निकाल रोखून चौकशी सुरू केली आहे.दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांमध्ये साधारणपणे १६ ते १७ वर्षे वयोगटातील मुले-मुली असतात. मात्र, पाथर्डी तालुक्यातील एका शाळेतून १९७२, १९७५, १९७७, १९८०, १९८५ जन्मतारीख असलेल्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नियमित अर्ज केल्याचे समोर आल्याने पुणे विभागीय मंडळ चक्रावले. प्रौढ विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे.मात्र, शाळेने प्रौढ विद्यार्थी नियमीत असल्याचे दाखविल्याचे पुणे विभागीय मंडळातील सूत्रांनी सांगितले. दादासाहेब फुंदे विद्यालयातील ९८ विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यात बहुतांश विद्यार्थी प्रौढ असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले. (प्रतिनिधी)पुणे विभागीय मंडळाने १०१ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेचा निकाल राखून ठेवला आहे. विभागीय मंडळाकडून चौकशी झाल्यानंतर संबंधित शाळेचा निकाल जाहीर केला जाईल. - गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य मंडळ
नगरमध्ये दहावीला चाळिशीची मुले; निकाल रोखला
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST