सोलापूर : गुंगीचे औषध देऊन कर्नाटकातून अपहरण केलेल्या दोन मुलांनी नाट्यमयरित्या आपली सुटका करून घेतली. मंगळवारी दुपारी राखीव पोलीस दलाच्या मदतीनेही मुले आई-वडिलांच्या ताब्यात गेली.गुलबर्गा जिल्ह्याच्या जेऊरगी तालुक्यातील रमेश देवप्पा परवेल (१६) आणि महेश यल्लालिंग करमेश्वर (१३) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. रमेश हा आठवीत तर महेश हा सातवीत शिकत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता दोघे पेन आणि इतर साहित्य घेण्यासाठी बाहेर पडले. त्याचवेळी इंडिका कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले आणि काय चालले हे कळण्याच्या आताच दोघांना गुंगीचे इंजेक्शन दिले. सोलापुरात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी जेवण करण्यासाठी एका हॉटेलसमोर कार थांबवली. अपहरणकर्ते हॉटेलात गेल्यानंतर काही वेळेतच रमेशला जाग आली. त्याने आत असलेल्या बाटलीतील पाणी महेशच्या तोंडावर शिंपडल्याने तोही जागा झाला. रमेशने कारमधील टॉमीने एका दरवाजाची काच फोडली. त्यातून दोघे बाहेर पडले आणि रेल्वे स्टेशन गाठले. त्याचवेळी मुंबईकडे निघालेल्या एका एक्स्प्रेसमध्ये दोघे जाऊन बसले. दोघे मोहोळमध्ये पोहचले. मोहोळ रेल्वे स्थानकावर ही दोन्ही मुले भेदरलेल्या अवस्थेत वावरत होती. त्याचवेळी आरपीएफचे जवान किरण गोडसे यांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. (प्रतिनिधी)