पुणे : उन्हाळ्याची सुटी घालवण्यासाठी जळगावहून पुण्याला मामाकडे आलेल्या आठ वर्षीय मुलाचा जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मार्केट यार्ड येथील गंगाधाम सोसायटीजवळ गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. क्रिश दिनेश राका (वय ८, रा. नहाटा हॉस्पिटलजवळ, जळगाव) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश हा मूळचा जळगावचा राहणार असून, तो तिसरीमध्ये शिकत होता. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे तो मामाकडे आला होता. त्याचे वडील जळगावमध्ये व्यापारी आहेत. त्याचे मामा प्रणय प्रकाश शिंगी हे गंगाधाम सोसायटीजवळील वर्धमानपुरा या सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. त्यांचा खासगी व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास क्रिश पोहण्यासाठी वर्धमानपुरा सोसायटीच्या जलतरण तलावामध्ये गेला होता. साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास त्याला पाण्यामध्येच उलट्या झाल्या. त्या वेळी तलावात अनेक जण पोहत होते. तसेच त्या ठिकाणी जीवरक्षकही होता. परंतु क्रिश बुडत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. पाण्यामधून बुडबुडे येऊ लागल्यावर काहींंचे त्याकडे लक्ष गेले. त्याला तातडीने बाहेर काढून छाती दाबून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. क्रिश याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वी मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
जलतरण तलावात मुलाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: May 16, 2014 04:23 IST