मुख्यमंत्री तोडगा काढणार?

By admin | Published: May 13, 2016 01:27 AM2016-05-13T01:27:50+5:302016-05-13T01:27:50+5:30

शहराची मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा, जायका, कचरा प्रकल्पाची जागा, विकास आराखडा यांसह अनेक महत्त्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडले आहेत.

Chief Minister will solve the problem? | मुख्यमंत्री तोडगा काढणार?

मुख्यमंत्री तोडगा काढणार?

Next

पुणे : शहराची मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा, जायका, कचरा प्रकल्पाची जागा, विकास आराखडा यांसह अनेक महत्त्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडले आहेत. यावर अनेकदा बैठका होऊन मार्ग काहीच निघत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १३ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये प्रश्नांवर तोडगा निघणार की पुन्हा आश्वासनेच मिळणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सविस्तर माहिती महापालिका प्रशासनाकडून संकलित करण्यात आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांपुढे ती ठेवली जाणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप व आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
प्रकल्पग्रस्तांच्या दोन मागण्या पूर्ण झाल्याशिवाय भामाआसखेड प्रकल्पाचे काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे रद्द करावेत व ६५ टक्के भरल्याशिवाय जमिनींचा ताबा मिळावा, अशा मागण्या त्यांनी ठेवल्या आहेत. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाचा असून, मुख्यमंत्र्यांपुढे हा प्रश्न ठेवण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. विकास आराखड्याला शासनाची अंतिम मंजुरी मिळत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे त्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहराची पाण्याची गरज लक्षात घेता किमान ६ टीएमसी पाणी मुळशी धरणातून घ्यावे लागणार आहे. मुळशी धरण ते शहरापर्यंत पाइपलाइन टाकण्यासाठीचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. मुळशी धरणामध्ये २८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्या पाण्यातून साडेतीनशे मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होते. तितकी वीज शासनाने त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवड यांना वाटून द्यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
पीएमपीच्या इमारती विकसित करण्यासाठी अडीच एफएसआय मिळावा, जायका प्रकल्पाच्या अडचणी दूर व्हाव्यात, पिंपरी सांडस येथील जागा कचरा प्रक्रियेसाठी मिळावी, अमृत योजना वेगाने मार्गी लागावी आदी विषय मुख्यमंत्र्यांपुढे मांडले जाणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार,
आमदार, पालिकेतील गटनेते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Chief Minister will solve the problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.